इस्लामाबाद - पाकिस्तानातील वृत्तवाहिन्या आणि तेथील पत्रकार नेहमीच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतात. पूर आलेल्या नदीच्या मधोमध जाऊन रिपोर्टिंग करत चांद नवाब या पत्रकारने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा पाकिस्तानातील एका टीव्ही शो दरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माजी महिला सहाय्यक डॉक्टर फिरदोस आशिक अवान यांनी पाकिस्तानी खासदाराच्या कानशिलात लगावली.
शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कादिर मंडोखेल आणि फिरदोस आशिक अवान यांच्यात एका कारणावरुन वाद झाला. त्यांनी थेट कादिर यांची कॉलर पकडली आणि कानफटात लगावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एक्सप्रेस टीव्ही चॅनेलवर एका शोच्या रेकॉर्डिंगवेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.
या संपूर्ण प्रकरणावर एक व्हिडिओ जारी केला आहे. वडिलांबद्दल अपशब्द वापरुन धमकी दिल्यामुळे मला तसे करण्यास भाग पडलं, असे स्पष्टीकरण फिरदोस आशिक अवान यांनी दिलं. तसेच त्या मांडोखेल विरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या शो दरम्यान माझी राजकीय प्रतिष्ठा धोक्यात होती. मी या संपूर्ण प्रकरणी माझ्या वकीलांशी बोलत आहे, असेही त्या म्हणाल्या.