नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावर आज सायंकाळी सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. यामध्ये मालदीव, पाकिस्तान, अफगाणीस्तान, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि भुतान या देशाच्या नेतृत्वांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व केले. आम्ही परराष्ट्रामधून 1 हजार 400 भारतीयांना मायदेशी आणले आहे. तसेच शेजारी देशांचीही मदत केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारतामध्ये विशेष अभियान राबवण्यात येत आहे. कोरोनाविरोधात लढण्याची नाही तर सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मत मोदींनी चर्चेत मांडले.
आम्ही चाचणी किट आणि इतर उपकरणासह भारतातील डॉक्टर आणि तज्ञांचे पथक तयार करत आहोत. याचबरोबर कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर आपत्कालीन निधी जमवण्याची गरज आहे. निधी आपल्या इच्छेनुसार देता येईल, असे मोदी म्हणाले. भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
चीन, अमेरिका आणि इराण या देशांच्या वस्तू आपल्यासाठी उपयुक्त नाहीत, कोरोनाविरोधात लढण्यासाठी नियोजनबद्द उपाययोजना करण्याची गरज आहे. सीमा बंद केल्याने अन्न, औषधी आणि इतर जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा निर्माण होईल, असे अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी म्हणाले.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांनी कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर पुढाकार घेतल्याबद्दल मोदींचे आभार मानले. कोरोनाचा सामना एक देश करु शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मोहम्मद सोली म्हणाले.
गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून आम्ही उभारी घेतच होतो. मात्र, कोरोना विषाणूने अर्थव्यस्थेला मोठा झटका दिला आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याचा मी सार्क देशांना सल्ला देऊ इच्छितो. सार्क देशासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी म्हटले आहे.
वुहानमधून भारतीय विद्यार्थ्यांसह बांगलादेशाच्या विद्यार्थ्यांची सुटका केल्याबद्दल बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. बांगलादेशाचे 23 विद्यार्थ्यांची सुटका केल्याबद्दल मोदींचे आभार, असे त्या म्हणाल्या.
55 हजारहून कोरोना विषाणू बाधीत रुग्ण तर 5 हजार 833 मृत्यू आणि 138 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी कोणताही देश बेजबाबदार होऊ शकत नाही. कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल पाकिस्तानने आपली चिंता व्यक्त केली आहे. सार्कच्या जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणू बाबींची पुष्टी झाली आहे. आपण प्रत्येक वाईट परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल, अशी अपेक्षा आहे, असे पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा म्हणाले.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन कोरोनो विषाणूविरोधात व्यापक उपाययोजना करण्यासाठी सार्क देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिले होते. 'सार्क देशांच्या नेतृत्वाने कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक ठोस उपायोजना करायला हवी. देशातील नागरिकांच्या आरोग्यासंबधी आपण व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून चर्चा करू शकतो आणि कोरोना विषाणूचा होणार प्रसार थांबवू शकतो', असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते