ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ते १८ मार्च दरम्यान बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या अध्यक्ष शेख हसीना यांच्यात अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधील स्थानिक माध्यमांनी मोदींच्या बांगलादेश दौऱ्याचे वृत्त दिले आहे.
ढाका ट्रिब्यूनने विविध स्त्रोतांचा हवाला देत मोदींच्या दौऱ्याची शक्यता वर्तवली आहे. मोदींच्या दौऱ्यामध्ये अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे ट्रिब्यूनने म्हणले आहे. मोदी तीन दिवसीय दौऱ्यावर १६ मार्चला निघणार आहेत. १७ तारखेला बांगलादेशचे माजी पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला मोदींच्या दौऱ्याची तयारी करण्याासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशला जाणार असल्याचे म्हटले आहे. मागच्या वर्षी मोदींच्या निमंत्रनानंतर शेख हसीना यांनी २ ऑक्टोबरला भारत दौरा केला होता. त्यावेळी भारताने कांदा निर्यात थांबवल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हसीना यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सीएए कायद्यावरही मत व्यक्त केले होते. सीएए कायदा करण्यामाचा उद्देश मला समजला नाही. या कायद्याची गरज नव्हती, असे त्या म्हणाल्या होत्या.