लाहोर - टिकटॉक या मोबाईल अॅपवर तातडीने बंदी आणावी, अशी याचिका पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नदीम सरवार या वकिलाने एका नागरिकाच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानमधील वृत्तसंस्था 'डॉन'ने याबाबत माहिती दिली.
या अॅपमुळे देशात दहाहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात आधीच एक खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या तारखाही अजून नक्की नसल्याचे या वकिलाने सांगितले.
तसेच, या अॅपवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक पॉर्नोग्राफिक कंटेंटही मोठ्या प्रमाणात पसरवत आहेत. याबाबत अधिक सांगताना त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामध्ये एका मुलीवर तिच्या टिकटॉकवरील मित्रांनी सामूहीक अत्याचार केला होता.
या अॅपचा गैरवापरच मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्यामुळे मलेशिया आणि बांगलादेशसारख्या देशांमध्येही हे अॅप बॅन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच देशातही लवकरात लवकर या अॅपवर बंदी आणावी असे आवाहन त्यांनी केले आहे.