रावळकोट - पाकव्याप्त काश्मीरमधील जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) नेते सरदार साघीर यांनी दहशतवादाला खतपाणी घातल्याबद्दल पाकवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे धोरणच आतापर्यंत काश्मीरमधील गोंधळाच्या आणि क्षोभाच्या परिस्थितीला कारणीभूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी आतापर्यंत दहशतवाद्यांचा आपले प्रतिनिधी असल्याप्रमाणे वापर केला आहे.
'जम्मू काश्मीरच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानने १९४७ मध्ये तेथे घातपाती कृत्यांचा अवलंब केला. त्यासाठी पश्तून जमातीच्या लोकांना तेथे पाठवण्यात आले. तेव्हा १९८० च्या दशकात तेथील स्थानिकांनी दुसऱ्यांदा मुक्ती चळवळ सुरू केली, तेव्हा पाकने पुन्हा एकदा त्यात उडी घेत त्या चळवळीला दहशतवादाचे रूप देण्यास सुरुवात केली. त्यात सहभागी झालेल्या तरुणांना हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण देऊन हिज्बुल मुजाहिदीन, जमियत-उल-मुजाहिदीन असे दहशतवादी गट तयार केले,' असे साघीर यांनी म्हटले आहे.
'नंतर हाफिज सईदच्या लश्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या संघटनांना पुढे आणण्यात आले. १९९२-९३ मध्ये आम्ही पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने आणलेल्या या राज्याबाहेरील संघटनांचा निषेध करण्यास सुरुवात केली. आम्ही शांततेच्या मार्गाने करत असलेल्या या संघर्षाचा विनाश घडवून आणण्यात आला. आता आंतरराष्ट्रीय समुदाय त्याकडे दहशतवादी कृत्यांच्या संशयाने पाहात आहे,' असे ते म्हणाले.
सध्या साघीर हे पाकव्याप्त काश्मीरमधील सक्रिय कार्यकर्ते आहेत. येथील लोक पाकिस्तानकडून केला जाणारा छळ आणि दहशतवादाने गांजलेले आहेत.
नुकतीच, पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तान आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये ३० हजार ते ४० हजार दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची कबुली दिली आहे.
'सध्या पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या घुसखोरीला प्रोत्साहन देण्यासाठी करत आहे. यासाठी जैशद्वारे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तेथून या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी वापरण्यात येईल. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष काश्मीर खोऱ्याकडे लागले आहे. मात्र, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ते हेतूपुरस्सर विचलित करण्यात गुंतल्या आहेत,' असे साघीर म्हणाले.