इस्लामाबाद : १५ सप्टेंबरपासून देशातील शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या शैक्षणिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि बळींमध्येही सातत्याने घट होत असल्याचे दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. यासोबतच, विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता देशातील शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मे महिन्यात काही प्रमाणात व्यापार आणि इतर व्यवहार सुरू करण्यात आले होते, मात्र शाळा तरीही बंद होत्या. त्यानंतर आता कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आणि बळींमध्येही सातत्याने घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये १५ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, बाकी प्रांतांमधील शाळा सुरू करण्याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवारी पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या तीन बळींची नोंद झाली. आतापर्यंत देशात २ लाख ९८ हजार ९०३ कोरोना रुग्णांची, तर ६ हजार ३४५ कोरोना बळींची नोंद झाली आहे.
हेही वाचा : ट्रम्प निवडणुका हरल्यास ९/११ प्रमाणे हल्ला होईल; ओसामा बिन लादेनच्या पुतणीचा दावा