इस्लामाबाद - भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात सत्ता ( Political change visible in Pakistan ) बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानात राजकीय गदारोळ माजला असून पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्व विरोधक एकटावले असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांची आघाडी झाली असून पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास प्रस्ताव म्हणजे, विश्वास ठराव लोकसभेत मंजूर झाल्यास सत्ताधाऱ्यांना राजीनामा द्यावा लागतो.
बिलावल अली झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान सरकारमधील मित्र पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट हे विरोधकांच्या आघाडीत आहेत. ऐवढेच नाही तर इम्रान खान यांच्या जवळचे मंत्र्यांनीदेखील त्यांच्याविरोधात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या मेहेरबानीमुळेच इम्रान खान यांना सत्ता मिळाली होती. परंतु, देशात नीती लागू करण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. महागाई, देशावरील वाढतं कर्ज आणि कथित कुशासन यांसाठी इम्रान खान सरकारवर टीकेचा भडीमार होतोय. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानात लष्कर आणि आयएसआय सरकार बनवण्यासाठी आणि पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं, हे अनेकदा स्पष्टपणे समोर आलेलं आहे.
इम्रान खान यांचे तिसरे लग्नही तुटणार?
पंतप्रधान पदाबरोबर आता इम्रान खान यांचे तिसरे लग्नही तुटण्याच्या मार्गावर आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यातील मतभेद खूपच वाढले आहेत. बुशरा बीबी या इस्लामाबाद सोडून लाहोरला गेल्या आहेत. मैत्रिण सानिया शाहसोबत त्या राहत आहेत. तर दुसरीकडे बुशरा बीबी यांनी घर सोडताच इम्रान खान यांनी घरातील सर्व कर्मचारी बदलले आहेत. इम्रान खान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ, 2015 मध्ये रेहान खान यांच्याशी विवाह केला होता. रेहान खानसोबत लग्नानंतर काही महिन्यातच इम्रान खान यांनी घटस्फोट घेतला होता.