नवी दिल्ली - राजकारण, क्रिकेट आणि अर्थव्यवस्था सगळीकडून निराशाजनक बातम्याच ऐकायला मिळत आहेत, अशी खंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे, ही समाधानकारक बातमी नाही, असे ते यावेळी म्हणाले.
आम्ही जेव्हा बातम्या ऐकतो तेव्हा सांगितले जाते की, देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. ती आयसीयुत आहे. आम्ही संसदेतून येणाऱ्या बातम्या ऐकतो तेव्हा अशी माहिती मिळते की, सदनातील सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची परवानगीच नाही. हे सर्व निराशाजनक आहे, असे खोसा यावेळी म्हणाले. त्यांचा इशारा सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तहरीक -ए- इन्साफ आणि विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग या दोन पक्षांत असलेल्या मतभेदांकडे होता.
हे सर्व पाहणे टाळण्याठी आम्ही क्रिकेट विश्वचषकाकडे बघतो तर तिथेही पाकिस्तानची कामगीरी निराशाजनकच आहे, असे ते यावेळी म्हणाले. देशाला चांगल्या बातम्या कुठे ऐकायला मिळत असतील तर त्या केवळ न्यायलयातूनच मिळतात, असा टोलाही त्यांनी लगावला.