इस्लामाबाद - पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार सर्वश्रुत आहेत. अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानला फटकारण्यात आल्यानंतर पाकिस्तानने शनिवारी रहीम यार खान येथील हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी 38 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या 38 जणांना बहावलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद यांनी पंजाब पोलीस प्रमुखांना रहिम यार खान येथील जमावापासून हिंदू मंदिराचे संरक्षण करण्यास अपयशी ठरल्याबद्दल फटकारले होते. या घटनेतील सर्व दोषींना अटक करण्याचे निर्देश न्यायालयान दिले होते.
रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग गावात गुरुवारी जमावाने हिंदू मंदिराची तोडफोड केली. जमावाने मूर्तींची तोडफोड केली होती. या संपूर्ण घटनेचा पाकिस्तानी खासदार आणि हिंदू समाजाचे नेते रमेश कुमार वंकवानी यांनी व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, जमाव मंदिरात तोडफोड करत असल्याचे दिसत होते.
काही दिवसांपूर्वी एका लहान हिंदू मुलाने मुस्लिम मदरशामधील वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ईश्वारनिंदा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अल्पवयीन असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.
पाकिस्तानात अल्पसंख्यांक असुरक्षित -
तथापि, पाकिस्तानकडून नेहमीच भारतावर काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नांवरून टीका करण्यात येते. मात्र, पंतप्रधान इम्रान खान हे स्वत:च्या देशातील अल्पसंख्यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती.
हेही वाचा - पाकिस्तानात आढळले 1 हजार 300 वर्ष जुने विष्णुचे मंदिर