इस्लामाबाद - शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त, शीखधर्मीयांच्या सोयीसाठी पाकिस्तान रेल्वेमार्फत रविवारी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी 'नानकाना साहिब' ते कराचीदरम्यान धावणार आहे.
'नानकाना साहिब'हून सकाळी १० वाजता कराचीकडे निघालेली ही गाडी शोरकोट कँट, खानवाल, रोहरी, नवाब शहा, शहदादपूर, हैदराबाद आणि कराची कँटमार्गे दुसर्या दिवशी सकाळी ११.५० वाजता शहरात पोहोचेल.
पाकिस्तान रेल्वेने शीख समुदायाला डोळ्यासमोर ठेऊन या गाडीच्या बनावटीमध्ये विशेष बदल केला आहे. लोअर एसी कोचमध्ये खाली गालीचे अंथरून विशेष केंद्रीय हॉल बनवला गेला आहे. तर, गाडीचा एक डबा शीखांचा धर्मग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब' याला अर्पण करण्यात आला आहे. गुरु नानक यांचे जन्मस्थान नानकाना साहिब आणि त्यांचे विश्रांतीस्थान, दरबार साहिब करतारपूर या जागांच्या तसेच इतर धार्मिक प्रतिमांनीही या ट्रेनला सुशोभित केले गेले आहे.
या जयंती उत्सवानिमित्त पाकिस्तान १०,००० शीख भाविकांना व्हिसा देणार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाविकांची पहिली तुकडी विशेष रेल्वेने पाकिस्तानकडे रवाना होईल. यात्रेकरू अटारी रेल्वे स्थानकातून वाघा रेल्वे स्थानकात जातील आणि त्यानंतर नानकाना साहिबकडे रवाना होतील. 8 नोव्हेंबरपर्यंत शीखबांधव पाकिस्तानचा दौरा सुरू ठेवतील.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या हस्ते करतारपूर कॉरिडॉरचे ८ नोव्हेंबरला उद्घाटन