बिश्केक - किर्गिझस्तानाची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया, पाकच्या वरदहस्ताने सुरू असलेला दहशतवाद या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या भेटीविषयीची माहिती दिली. चीन आणि भारतादरम्यानचे संबंध दृढ व्हावेत अशी अपेक्षा आहे.
'पाकिस्तानने त्यांची भूमी दहशतवादमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे भारताला वाटते. मात्र, तसे होताना दिसत नाही. पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवादी कारवाया यांच्याविरोधात भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, हे मुद्दे मोदींनी जिनपिंग यांच्यासमोर मांडले. तसेच, दोन्ही देशातील संबंध दृढ होण्यासाठी जिनपिंग यांना अनौपचारिक भेटीसाठी भारतात येण्याचे निमंत्रण मोदींनी दिले आहे. यंदा भारत-चीन संबंधांची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने दोन्ही देशांदरम्यान ७० कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. यापैकी ३५ कार्यक्रम भारतात तर ३५ कार्यक्रम चीनमध्ये ठेवण्याचा विचार आहे' असे गोखले यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट झाली आहे. चीनच्या राष्ट्रपतींनी मोदींना निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. या परिषदेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर येऊनही भारतातर्फे मोदींनी त्यांच्याशी साधे हस्तांदोलनही केले नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानचा हरप्रकारे निषेध करण्याचे धोरण भारताने स्वीकारले आहे.