इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याचे न्यायालयीन आदेश पाकिस्तानने दिले आहेत. मात्र, अद्याप याबाबत भारत सरकारने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानमध्ये अडकलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावर गुप्तहेर असल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तीन सप्टेंबरला यासंदर्भात इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी 6 सुनावणी पुढे ढकलली होती. तसेच न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची आणखी एक संधी भारताला दिली होती. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे)ने याबाबत दिलेल्या निर्देंशांचे पालन करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. तसेच, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही भारताला वकील नेमण्यासाठीही सांगितले होते. मात्र, अद्याप भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाहीद हाफीज चौधरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान मधून 2016 मध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन अटक केली, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. इरानियन पोर्ट चबहार येथून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले, असा भारताचा दावा आहे. 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या या निर्णयाला 2019 च्या जुलै महिन्यात स्थगिती दिली. भारत सरकारने या प्रकरणी पाकिस्तान व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा : भारत-चीन सीमातणाव : सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एकमत