इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (एन) नेत्या मरियम यांचे पती सफदर अवन यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेवरून पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. सफदर यांना का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये अटक करण्यात आली, याची चौकशी करण्याचे आदेश बाजवा यांनी दिले आहेत.
कराचीमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत रॅली काढली होती. 18 ऑक्टोबरच्या रात्री सफदर अवन यांना अटक करण्यात आली. तसेच, हॉटेलच्या खोलीमध्ये तोडफोड करण्यात आली आणि सफदरला घेऊन गेले, असा आरोप नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी केला आहे. ठोस पुराव्याच्या अभावी अटकेच्या काही तासानंतरच पोलिसांनी सफदर यांना सोडले.
या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ उडला असून याप्रकरणाची चौकशी लष्कर करणार आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान स्वत:च्या चुका लपवण्यासाठी विरोधी पक्षांना दडपवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान सरकारविरोधात विरोधी पक्षांनी बंड पुकारले आहे. पहिल्या सभेला भरपूर प्रतिसाद मिळाल्यानंतर कराचीमध्ये दुसरी सभा घेण्यात आली होती.