इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी गुरुवारी विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली होती.
पाकिस्तानमधील डॉन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ९० पानांच्या याचिकेमध्ये मुशर्रफ यांनी विशेष न्यायालयाचा निकाल असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रकारे या खटल्याची सुनावणी पार पडली, तो संविधानाचा आणि १८९८ मधील फौजदारी प्रक्रियेच्या संहितेचा भंग आहे. त्यामुळे या विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुशर्रफ यांनी केली आहे.
सोमवारीच पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाने या विशेष न्यायालयाची स्थापनाच असंवैधानिक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गुरुवारी मुशर्रफ यांनी विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गेल्या वर्षी १७ डिसेंबरला इस्लामाबादमधील या विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर प्रमुखाला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. मुशर्रफ हे सध्या दुबईमध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मागच्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाचा चीनसह पाकिस्तानला पुन्हा दणका