कराची - पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमी बलुचिस्तान प्रांतात निमलष्करी दलाच्या सुरक्षेत जात असलेल्या तेल आणि वायू कामगारांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 7 सैनिकांसह 14 जण ठार झाले आहेत. ग्वादर जिल्ह्यातील ऑरमारा गावात सरकारी ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (ओजीडीसीएल) कामगारांवर गुरुवारी हा हल्ला झाला.
पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांचेही मोठे नुकसान झाले आहे, अशी पाकिस्तान सैन्याची मीडिया विंग असलेल्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने (आयएसपीआर) पुष्टी केली आहे. हा एक नियोजित हल्ला आहे. तेल आणि वायू कामगारांचा ताफा कराचीकडे रवाना होत असल्याची माहिती अतिरेक्यांना होती, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.
चीन-पाकिस्तान दरम्यान उभारण्यात येणाऱ्या आर्थिक कॉरिडॉरचे ग्वादर बंदर हे केंद्रबिंदू आहे. ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहेत. आतापर्यंत एकाही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.