इस्लामाबाद - पाकिस्तानने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेला लॉकडाऊन वाढवला आहे. शुक्रवारी याबाबत घोषणा करण्यात आली. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत ११ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे शासनाने लॉकडाऊन 9 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, नव्याने १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २३७ झाली आहे. आतापर्यंत २ हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. मागील चोवीस तासांत ६४२ कोरोनाबाधित समोर आले असून पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार १५५ झाली आहे.
पंजाब प्रांतात कोरोनाचे ४ हजार ७६७, सिंधमध्ये ३ हजार ६७१, खैबर-पख्तूनख्वामध्ये १ हजार ५४१, बलूचीस्तामध्ये ६०७, गिलगीट-बलिस्तानमध्ये ३००, इस्लामाबादमध्ये २१४ आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ५५ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत १३ हजार ३६५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून त्यात मागील चोवीस तासात तब्बल ६ हजार ८३९ चाचण्या घेण्यात आल्या. सध्या पाकिस्तानमधील कोरोनाबाधितांची संख्या हळूवारपणे वाढत आहे. मे किंवा जून महिन्यात देशात कोरोनाबाधितांची संख्या सर्वोच्च असण्याची शक्यता एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयाने वर्तवली.
सध्या सुरू असलेला लॉकडाऊन ९ मे पर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय समन्वय समितीने घेतला आहे. नियोजन मंत्री असद उमर यांनी शुक्रवारी याबाबत माध्यमांना माहिती दिली.