जकार्ता - इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात भूस्खलनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आपत्ती निवारण एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या नैसर्गिक आपत्तीमुळे 17 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय, 14 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (बीपीबीडी) आणीबाणी विभागाचे प्रमुख बुदी बुदिमन यांनी सांगितले की, सुमेदंग जिल्ह्यातील सिहांजुआन गावात सायंकाळी चारच्या सुमारास भूस्खलन झाले आणि त्यात दबल्याने 8 लोकांचा मृत्यू झाला. ते म्हणाले, 'जेव्हा पीडितांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू होते, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा भूस्खलन झाले. यामुळे आणखी लोकांना जीव गमवावे लागले.'
हेही वाचा - 2020 मध्ये न्यूयॉर्कमध्ये गोळीबाराच्या घटनांत 16 वर्षातील सर्वाधिक 97 टक्के वाढ
दुसऱ्यांदा झालेल्या भूस्खलनात ठार झालेल्यांमध्ये जिल्ह्यातील बीपीबीडीच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख आणि सिमनाग उपजिल्ह्यातील सैन्य कमांडर यांचाही समावेश आहे.
बुदिमन म्हणाले की, भूस्खलनामुळे एकूण 14 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या घरांमधील 17 लोक जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांवर उपचार सुरू आहेत.'
रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत 500 हून अधिक बचावकर्ते कामाला लागले आहेत. तीन मोठ्या मशिनरींच्या आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने हे बचावकार्य सुरू आहे.
इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेनेही (BNPB - Indonesian National Board for Disaster Management) या घटनेविषयी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. तसेच, घटनेनंतरच्या स्थितीची आणि आपत्तीनिवारण कार्याची दृश्ये छायाचित्रांद्वारे सामायिक केली आहेत.
हेही वाचा - अॅपलने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर युकेमधील सर्व स्टोअर्स केले बंद