इस्लामाबाद - पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी भारताशी समझोता करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत 'भारतीय हेर' कुलभूषण यांच्या प्रकरणी संविधानानुसार पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी समझोत्याचा प्रश्नच नसल्याचे पाकने म्हटले आहे.
काही पाकिस्तानी मीडियामध्ये अशा आशयाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता की, भारतीय नागरिक कुलभूषण यांना सिव्हिल कोर्टात अपील करण्याचा अधिकार देण्यासाठी पाकिस्तान आपल्या लष्करी कायद्यात संशोधन करणार आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने याचा साफ इन्कार केला आहे. जाधव यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे)च्या निर्णयासंदर्भात पाकिस्तानी कायद्यात बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - दिल्लीत गाड्यांची सम-विषम योजना प्रदूषण नियंत्रणासाठी उपयोगी ठरेलच असे नाही - सर्वोच्च न्यायालय
कुलभूषण यांचे प्रकरण पाकिस्तानी लष्करी न्यायालयात सुरू आहे. पाकिस्तानी लष्करी कायदा अशा आरोपांखालील व्यक्ती किंवा समूहाला सिव्हिल कोर्टात अपील करण्याची आणि न्याय मिळवण्याची परवानगी देत नाही. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दहशतवादाच्या आणि हेरगिरीच्या आरोपांखाली मृत्यूदंड सुनावला आहे.
दरम्यान, फैसल यांनी या पत्रकार परिषदेत बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाचाही उल्लेख केला. 'मशिदीच्या जागी मंदिर बांधण्याचा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भारतातील इतर अनेक मशिदींना धोका निर्माण केला आहे. आता आम्ही प्रत्येक व्यासपीठावर बाबरी मशिदीचा मुद्दा उपस्थित करू,' असे ते म्हणाले.