टोकियो - जपानच्या फुजीफिल्म कंपनीने आपल्या अविगन या औषधाची कोरोनाच्या रुग्णांवर चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. चीनमध्ये या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर जपानने हा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये पूर्वीच या औषधाच्या कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी चाचण्या झाल्या आहेत.
फुजीफिल्म कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटपर्यंत सुमारे १०० रुग्णांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या चाचण्यांमध्ये मिळालेल्या माहितीचा अहवाल तयार करून मगच या औषधाच्या वापराबाबत अधिकृत परवानगी देण्यात येणार आहे. २० ते ७४ वर्षे वयोगटातील कोरोनाच्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच, प्राण्यांवर याची चाचणी करण्यात आली होती तेव्हा गरोदर प्राण्यांवर याचे दुष्परिणाम दिसून आल्यामुळे गर्भवती महिलांवर याची चाचणी करण्यात येणार नाही.
अॅविगन या औषधामध्ये असलेला मूळ घटक फॅविपिरावीर (Favipiravir) याची कोरोनाच्या रुग्णांवर चीनने मागील महिन्यातच चाचणी सुरू केली होती. याचे सकारात्मक परिणाम रुग्णांवर दिसून आले. यानंतर, जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी जपानमध्ये याच्या चाचणीसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले.
फुजीफिल्म सोडून दुसऱ्या संस्थांनी केलेल्या दोन चाचण्यांमध्ये असे आढळून आले होते, की या औषधामुळे रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा कालावधी कमी होतो आहे.
दरम्यान, मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोक्लोरोगाईन आणि क्लोरोगाईन या औषधांचाही कोरोनाच्या रुग्णांवर काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. फ्रान्स आणि चीनमध्ये सुरूवातीला झालेल्या काही चाचण्यांमध्ये हे आढळून आले होते. मात्र, याचे मोठ्या स्तरावर संशोधन झाल्याशिवाय कोणीही याचा वापर करू नये असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
हेही वाचा : लॉकडाऊन : 12 दिवसांपासून उपाशी असल्याचा प्रशासनाला मेसेज, घरी जाऊन पाहिले तर सुरू होती दारू पार्टी