अबुधाबी - संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी, नीट (NEET) परीक्षेसाठी स्थानिक केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बहुतांश प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे परीक्षेला बसण्यासाठी त्यांना भारतात येणे शक्य होईल, की नाही याची कोणतीही शाश्वती देता येत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे.
वैद्यकीय पूर्व परीक्षा असलेली 'नीट' ही यावर्षी २६ जुलैला होणार आहे. अनिवासी भारतीयदेखील ही परीक्षा देऊ शकतात. मात्र, ही परीक्षा केवळ ऑफलाईनच देता येत असल्यामुळे, या विद्यार्थ्यांना भारतात येण्यावाचून पर्याय नाही. एरवी हे विद्यार्थी आपले मूळगाव किंवा त्या राज्यातील एखाद्या केंद्राची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे त्यांना देशात येता येईल की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही.
यावर्षीच्या नीट परीक्षेसाठी जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, यांपैकी ३०० विद्यार्थी हे यूएईमधील आहे. देशातील बहुतांश भाग हा 'रेड झोन'मध्ये असल्यामुळे, त्यांना परीक्षेला उपस्थित राहता येईल का, याबाबत आशंका आहे. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन पेटिशन दाखल करत, यूएईमध्ये नीटचे केंद्र उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यूएईमधील मक्काडेमिया या शैक्षणिक संस्थेचे सीईओ सुब्रमण्यम कृष्णमूर्ती यांनी सांगितले, की एनटीए (जी संस्था नीट परीक्षेचे कामकाज पाहते) त्यांच्या या मागणीचा विचार करत आहे. तसेच, मक्काडेमियानेही स्थानिक पातळीवर ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी होणारा खर्चही मक्काडेमिया उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : सिमडेगामध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर; पाच जणांना अटक