बीजिंग : संयुक्त राष्ट्रांनी असा अंदाज वर्तवला होता, की २०२७मध्ये भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. मात्र, चीनने दिलेल्या एका अहवालानुसार हे त्याहूनही आधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये चीनमधील जन्मदर सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे हा अंदाज बांधण्यात आला आहे.
२०१९ला संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या एका अहवालात म्हटले होते, की भारतामध्ये आज आणि २०५०च्या दरम्यान २७३ दक्षलक्ष लोकांची वाढ होईल. २०२७मध्ये भारत देश चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल. तसेच, या शतकाच्या अखेरपर्यंत भारतच सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहिल, असे भाकितही या अहवालात वर्तवण्यात आले होते. यावर्षी भारताची लोकसंख्या १३७ कोटी होती, तर चीनची १४३ कोटी होती.
चीनमध्ये दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यानुसार चीनमध्ये सध्या सुमारे १४१ कोटी नागरिक आहेत. त्यामुळे सध्या तरी चीनच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र, भारतामध्ये २०१९मध्येच १३७ कोटी लोक होते. त्यानंतर जनगणनेचा अहवाल आला नाही. त्यामुळे भारत येत्या दोन ते तीन वर्षांमध्येच चीनला मागे टाकेल, असे चीनच्या ग्लोबल टाईम्स या दैनिकात म्हटले आहे. ग्लोबल टाईम्स हा चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र आहे.
पेकिंग विद्यापीठाच्या सोशिओलॉजी विभागातील प्रोफेसर लू जेहुआ यांच्या म्हणण्यानुसार, चीनची लोकसंख्या २०२७ला आपल्या सर्वोच्च अंकापर्यंत जाईल. त्यानंतर ती दरवर्षी कमी होत जाईल. तर इतर काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा 'पीक पॉइंट' २०२२लाच येऊ शकतो. त्यानंतर चीनची लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल.
चीनमध्ये २०२० या वर्षात १२ दशलक्ष बाळांचा जन्म झाला. सलग चौथ्यावर्षी चीनमधील जन्मदर कमी झाला आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांमध्ये चीनमधील जन्मदर १० दशलक्षांवर जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे चीनमधील मनुष्यबळही कमी होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच चीन सरकारने २०१६मध्येच 'एक मूल' नियम मागे घेत नागरिकांना दोन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही जन्मदर कमीच होताना दिसून येत आहे.
हेही वाचा : गाझा : पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असतानाच झाला मिसाईल हल्ला; पाहा व्हिडिओ..