हाँगकाँग - हाँगकाँगमधील नागरिकांना देश सोडून अमेरिकेत यायचे असेल तर, त्यांचे स्वागतच असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने हाँगकाँगची लोकशाही विचारधारा आणि चळवळ दडपून टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा पास केला आहे. या कायद्यास हाँगकाँगवासीयांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, तरीही चीनने नागरिकांचे आंदोलन दडपून टाकत कायदा पास केला.
'चीनच्या झिगझियांग प्रांतात उयघुर मुस्लिमांचा नरसंहार सुरू आहे. हाँगकाँगमध्ये लोकशाही चळवळ दडपण्यात येत आहे. हाँगकाँग सोडून तेथील रहिवासी अमेरिकेत येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागतच आहे. ते खूप चांगले लोक आहेत, तसेच चीनपासून संरक्षण करण्यासाठी तैवानने आपली सुरक्षा वाढवली पाहिजे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटल्याचे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे.
हाँगकाँग, तैवान, व्यापार युद्ध, दक्षिण चिनी समुद्र या विषयांवरून अमेरिका आणि चीनमधील संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत. अमेरिकेचे अनेक लष्करी जहाजे दक्षिण चिनी समुद्रात चीनचा प्रभाव रोखण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही देशांतील वादानंतर आशियायी भू-राजकीय परिक्षेत्रात वेगाने घडामोडी घडत आहेत. चीन-भारत सीमावाद सुरू झाल्यानंतर अमेरिकाचा भारताला पाठिंबा आहे. त,र अनेक आशियायी राष्ट्रे चीन विरोधात एकवटली आहेत.
अमेरिकेच्या संसदेने 'द फ्युचर ऑफ डिफेन्स टास्क फोर्स रिपोर्ट २०२०' नुकताच जाहीर केला आहे. चीन सतत आपल्या लष्करी ताकदीत वाढ करत असून पुढील पाच वर्षांत चीन अमेरिकेच्या लष्कराला मागे टाकेल, असा अंदाज समितीतील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. भविष्यात अमेरिकेच्या लष्कराची गती आता आहे तशीच राहिली तर, चीन पुढे जाण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. भविष्यात अमेरिकेने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवावी, असा सल्ला अहवालातून देण्यात आला आहे.