नवी दिल्ली - पाकिस्तान सरकारने 200 वर्षापूर्वींचा असलेला गुरुद्वारा सिंग सभा पाकिस्तानातील शीख बांधवांना हस्तांतरित केला. 1947 मध्ये झालेल्या भारत-पाक फाळणीनंतर गुरुद्वारा सिंग सभाचे रुपांतर शाळेमध्ये करण्यात आले होते. बलुचिस्तान प्रांतातील क्वेटामध्ये असलेल्या गुरुद्वाराचे पुनर्नवीकरण केल्यानंतर पाक सरकारने शीख बांधवांना गुरुद्वाराचा ताबा दिला.
भारत-पाक फाळणीनंतर याठिकाणी मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र, गुरुद्वाराच्या इमारतीमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते, अशी माहिती गुरुद्वाराचा ताबा मिळालेल्या गोविंद सिंग यांनी दिली. पाकिस्तानमधील शीख बांधवांनी गुरुद्वाराचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढली. त्यानंतर त्याचा ताबा मिळाला. बलुचिस्तानमध्ये असे आणखी 10 ते 15 गुरुद्वारा आहेत. त्यांचाही ताबा लवकरच मिळवला जाईल, असे आणखी एका शीख व्यक्तीने सांगितले.
गुरुद्वारामध्ये सुरू असलेली शाळा जवळच असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. गुरुद्वाराचा ताबा मिळाल्यानंतर शीख बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रार्थना केली.
शिख धर्मीयांच्या सर्वोच्च संस्था असलेल्या अकाल तख्तचे प्रमुख जाथेदार हरप्रीत सिंग यांनी गुरुद्वारासाठी कायदेशीर लढाई लढल्याप्रकरणी पाकिस्तानातील हिंदू आणि शिख बांधवांचे आभार मानले आहेत.
ऑगस्ट 2019 मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतांमध्ये असलेला गुरुद्वारा चोवा साहिब नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. गुरुद्वारा चोवा साहिबला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये शीख धर्मगुरू गुरू नानक देव जी यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ ज्या ठिकाणी घालवला तो गुरुद्वारा कर्तारपूर साहिब पाकिस्तानने भारतीय नागरिकांसाठी खुला केला.