हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले असून परिस्थिती गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात 1 कोटी 64 लाख 12 हजार 794 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 6 लाख 52 हजार 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 42 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दक्षिण कोरियात नव्या २५ रुग्णांची नोंद झाली असून तेथील बाधितांची संख्या १४ हजार १७५ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत २९९ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे 42 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये 23 लाखांचा आकडा कोरोनाग्रस्तांनी पार केला आहे. यापाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्येही झपाट्यानं वाढ होत आहे.
दरम्यान, जगभरातील देश कोरोनावर लस शोधण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. कोरोनासाठी जगभरात सध्या 145 हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी केवळ 20 लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे, तर भारतामध्ये स्वदेशी विकसित लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.