काबूल - अफगाणिस्तानात काबूलमधील अमेरिकन दूतावासाजवळ बुधवारी शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला. या भागात आणखीही काही देशांचे दूतावास आहेत. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११ ला झालेल्या हल्ल्याच्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या दिवशीच अमेरिकेच्या दूतावासाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. तसेच, या स्फोटाला अमेरिका आणि तालिबानची फिस्कटलेल्या वाटाघाटींचीही पार्श्वभूमी आहे.
हेही वाचा - पाकिस्तानात केवळ हिंदूच नव्हे; तर, मुस्लिमांवरही अत्याचार - माजी पाक आमदार
या स्फोटामुळे दूतावासाच्या इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. स्फोटात जीवितहानी झालेली नाही. हा स्फोट हा रॉकेट स्फोट होता, असे स्थानिक वृत्तसंस्थेचे पत्रकार जवाद जलाली यांनी म्हटले आहे. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानशी वाटाघाटींची शक्यता संपली आहे. आता यामध्ये काहीही करण्यास वाव नाही, असे म्हटले होते. यानंतर तालिबानने याचा सूड घेतला जाईल, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्फोट झाला आहे.
हेही वाचा - अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील काळा दिवस : 9/11