इस्लामाबाद - इंडोनेशियातील पाकिस्तानी माजी राजदूताने आपल्या कार्यकाळात जकार्तामधील दूतावास इमारत बेकायदेशीररित्या विकल्याचा प्रकार समोर आला आहे. नॅशनल अकाऊण्टेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
एनएबी अधिकाऱ्यांनी 19 ऑगस्टला माजी राजदूत सैय्यद मुस्तफा अनवर यांच्याविरोधात कथित आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुस्तफाने 2001-2002 या काळात इमारतीची बेकायदेशीर विक्री केल्यामुळे पाकिस्तानी सरकारी तिजोरीस तब्बल 1.32 मिलियन डॉलरचे नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंडोनेशियामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुस्तफाने पाकिस्तानी दूतावास इमारत विकण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी विदेश मंत्रालयाची परवानगी न घेता, इंडोनेशियामधील वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली. जेव्हा इमारत विकण्याचा करार झाला, तेव्हा सैय्यद मुस्तफा अनवर यांनी पाकिस्तानी विदेश मंत्रालयाला पत्र लिहिले. त्यावर विदेश मंत्रालयाने चौकशी केल्यानंतर मुस्तफाने समाधानकारक उत्तर दिले नाही. कार्यकाळात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी मुस्तफा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.