इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये आपले नाक खुपसले आहे. राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी मुस्लीम समाजाच्या भावना लक्षात घेऊन भारत निर्णय घेईल, अशी आशा असल्याचं पाकिस्तानी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले आहे.
राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरण खुपच संवेदनशील आहे. याप्रकरणी भारत मुस्लिमांच्या भावना लक्षात घेईल, अशी आशा आहे. भारतामधील अल्पसंख्याक समाजाला त्यांचा अधिकार मिळायला हवा, असे ते एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले आहेत.
५ ऑगस्टला जम्मू काश्मीरबाबतीत घेतलेला निर्णय भारताला एका बंद गल्लीमध्ये घेऊन गेला आहे. जेथून परतण्याचा मार्ग नाही. तेथे तो एकटा पडला असून त्यातून बाहेर कसे पडायचे हे भारताला समजत नाहीये, असे मोहम्मद म्हणाले.
पश्चिम भागातील तीनही नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. जर भारताने पाणी थांबवले. तर पाकिस्तान यावर आक्रमक भूमिका घेईल. करारानुसार पाण्याचा प्रवाह सुरू राहायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्याचे पाणी पाकिस्तानमध्ये जाऊ देणार नाही. पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या पाण्यावर हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्याचा हक्क आहे. पुर्वीच्या सरकारने यासंबधी कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र आम्ही घेऊ, असे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.