बीजिंग - चीनमध्ये कोरोनाच्या बळींचा आकडा २ हजार ८३५ वर पोहोचला आहे, अशी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या ७९ हजार २५१ च्या पुढे गेली आहे.
'देशाच्या आरोग्य समितीला ३१ प्रांतामध्ये COVID-19 च्या ७९ हजार २५१ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी ३७ हजार ४१४ जण सध्या आजारी आहेत. यांच्यापैकी ७ हजार ६६४ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. तर, ३९ हजार २ लोक बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. २ हजार ८३५ जणांचा मृत्यू झाला आहे,' असे आरोग्य समितीने म्हटले आहे.
कोरोनाचा ४५ देशांमध्ये प्रसार
जगभरात अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.
138 भारतीयांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 138 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील सहा जण क्रू मेंबर असून इतर सर्व प्रवासी आहेत. हे सर्वजण जपानच्या किनाऱ्यालगत समुद्रात उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर आहेत. पाकिस्तानातही #COVID१९ चे दोन रुग्ण आढळले आहेत.
दक्षिण कोरियात कोरोनाचे २ हजार ९३१ रुग्ण
दक्षिण कोरियात कोरोनाबाधितांची संख्या ५९४ ने वाढली आहे. आता येथे COVID-19 चे २ हजार ९३१ रुग्ण असल्याची अधिकृत माहिती आहे. आतापर्यंत २७ जण यातून बरे झाले आहेत. तर, १६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
नेदरलँडमध्ये पहिला रुग्ण आढळला
युरोपमधील नेदरलँडमध्ये कोरोनाची लागाण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. इटलीच्या प्रवासावर जाऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली.
इटलीत कोरोना संसर्गाने १० जणांचा मृत्यू
इटली, फ्रान्स, स्पेन या युरोपीय देशांमध्येही कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत इटलीमध्ये कोरोना बाधितांची संख्या ३२२ वर पोहोचली होती. यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे.
इराणमध्ये कोरोना
इराणच्या उपराष्ट्रपती मसौमेह एब्तेकर यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट 'पॉझिटिव्ह' आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
भयंकर कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे येथे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी १०६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे गुरुवारी आढळून आले. आता येथील कोरोनाबाधितांची संख्या २४५ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जगात आरोग्य आणीबाणी
जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. तसेच, हे संपूर्ण जगावर मोठे संकट असल्याचे म्हटले आहे.