बीजिंग (चीन) - कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर काही देश इतर देशांमधून औषध, मास्क इत्यादींची आयात करत आहेत. या कठीण प्रसंगात अनेक मोठे व्यावसायिक लोकांना मदत करताना दिसून येत आहेत. चीनमधील अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य जॅक मा यांनी एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कला १ हजार व्हेंटीलेटरची मदत केली होती. मा यांच्याच एका संस्थेने आफ्रिका, लॅटीन अमेरिका आणि आशियातील देशांमध्ये व्हेंटीलेटर, मास्क आणि इतर मदत पोहोचवली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला चीनमधून सुरुवात झाली. याच देशातील अनेक मोठे व्यावसायिक जगातील इतर देशांना औषध, जेवण आणि रोख रक्कम मदत म्हणून देत आहेत. टिकटॉक या अॅपने जगात २५० मिलियन डॉलरची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच व्हीचॅट या मेसेंजिंग अॅपनेदेखील १०० मिलियन डॉलरची मदत देणार असल्याचे जाहीर केले असून त्यांनी १५ देशांना मास्क आणि इतर उपकरणे पाठविली आहेत. संगणक बनविणाऱ्या लिनोव्हो आणि इलेक्ट्रिक ऑटोमेकर बीवायडी या कंपनीने मास्क आणि इतर साहित्याची मदत लोकांपर्यंत पोहोचवली आहे, तर हेयर स्मार्ट होम ही कंपनी पाकिस्तानमध्ये गरजूंना अन्नवाटप करत आहे.
चीनने जगभरात या विषाणूचा जाणीवपूर्वक संसर्ग पसरवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या मदतीमुळे चीनची प्रतिमा सुधारण्यास मदत होत आहे. कोणताही देश या संकटाशी एकटा लढू शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एकमेकांना शक्य ती मदत करणे गरजेचे आहे, असे जॅक मा सांगतात.
अमेरिकेतील वालमार्ट आणि अमॅझॉनसारख्या कंपन्या आफ्रीका, भारत आणि लॅटीन अमेरिकेला पैसे आणि औषधांची मदत करत आहेत. आफ्रीका, मध्य पूर्वेकडील देश, आशिया आणि संयुक्त राष्ट्र यांना मदतीसाठी १ अब्ज रुपयांची मदत देणार असल्याचे ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसे यांनी घोषित केले आहे. सिस्को सिस्टमने देखील जागतिक आरोग्य संस्थेला आणि संयुक्त राष्ट्राला मदत केली आहे.