इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन आणि पाकिस्तानची मैत्री जगजाहीर आहे. देशावर कोणतेही संकट आले की चीनच्या पदराआड लपणारा पाकिस्तान सध्या कोरोनाच्या तडाख्यात अडकला आहे. मात्र यावेळी चीनने पाकिस्तानची चांगलीच गोची केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानला चक्क 'अंडरवेअर'पासून बनवलेले मास्क पाठवले आहेत.
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन पाकिस्तानला उच्च प्रतीचे 'एन-९५' मास्क पाठवणार होते. चीन आपल्याला करत असलेल्या मदतीबाबत देशाचे पंतप्रधान इमरान खान यांनी आपल्या भाषणामध्ये चीनचे गुणगाणही गायले होते. मात्र चीनने पाकिस्तानला जे मास्क पाठवले, ते चक्क अंडरवेअरपासून बनवलेले होते.
याआधीही युरोपातील कित्येक देशांनी अशी तक्रार केली आहे, की चीन पाठवत असलेले वैद्यकीय साहित्य अतिशय खराब गुणवत्तेचे आहे. स्पेन आणि नेदरलँड सारख्या देशांनी तर चीनने दिलेले साहित्य परत पाठवण्याचा निर्णयही घेतला आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाचे आतापर्यंत सुमारे अडीच हजार रुग्ण आढळून आले असून, ४० जणांचा यात बळी गेला आहे.
हेही वाचा : कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला 'निरोगी' बाळाला जन्म!