कॅनबेरा - ऑस्ट्रेलियातील स्टेट ऑफ व्हिक्टोरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. एक जूननंतर येथील लोक कामावर गेल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे. येथील प्रशासनाने शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे.
स्टेट प्रिमियर डॅनियल अँड्र्यूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने 'वर्क फ्रॉम होम'च्या नियमावलीत सुधारणा केल्या आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे, जर कोणी व्यक्ती कामासाठी कार्यालयात गेला, तर त्या व्यक्तीला आणि संबंधित कंपनीलाही दंड भरावा लागणार आहे. जे सध्या घरातून काम करत आहेत, त्यांनी घरातूनच काम सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे अँड्र्यूस यांनी म्हटले आहे.
अर्थात, यातून काही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये सुपरमार्केट, नागरी वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या पुढील सूचना मिळेपर्यंत हा नियम लागू राहणार आहे. आम्हाला अद्याप काहीच कल्पना नाही की हे सर्व कधी थांबेल, आणि सर्व व्यवहार आधीप्रमाणे केव्हा सुरू होतील, असे डॅनियल म्हणाले.
स्टेट ऑफ व्हिक्टोरियामध्ये एकाच रात्रीत सात नवे रुग्ण आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या नव्या रुग्णांमध्ये एका शाळकरी मुलाचाही समावेश होता, ज्याला शाळेतून आल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समजले. यामुळे प्रशासनाने कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या सर्व नागरिकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : अमेरिकेत समाज माध्यमांवर येणार लगाम; डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्यकारी आदेश