काबुल - अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात अनेक ठिकाणी झालेल्या चकमकी आणि हवाई हल्ल्यांमध्ये 60 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. येथील सैन्यातर्फे रविवारी ही माहिती दिली.
हेल्मंड येथे हवाई हल्ल्यात तालिबान नेता मुल्ला शफीउल्लाह उर्फ मावलवी नाझिम आणि त्याचे पाच साथीदार मारले गेले, असे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने दिले आहे.
याव्यतिरिक्त, सोर्गोदर आणि बुशरान येथे सैन्याच्या हल्ल्यांसह स्वतंत्रपणे हवाई हल्लेही करण्यात आले. यामध्ये सैन्याशी झालेल्या चकमकीत 54 तालिबानी अतिरेकी ठार आणि इतर 8 जखमी झाले. संरक्षण मंत्रालयाने रविवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिबानचा विभागीय कमांडर अब्दुल सलाम आणि तीन बॉम्ब बनविणारे तज्ज्ञही होते, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेली 8 कमांड सेंटर्स नष्ट झाली. याशिवाय, हवाई हल्ल्यात शस्त्रे, वाहने आणि अनेक राउंड रॉकेट्स नष्ट करण्यात आली.
अफूच्या लागवडीसाठी कुख्यात असलेला हेल्मंड प्रांत हा तालिबानचा गड मानला जातो.
तालिबान्यांनी अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - काबूल विद्यापीठावरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला फाशीची शिक्षा