काबुल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या सैनिकांनी 17 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विविध अभियानात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अन्य 20 दहशतवादी जखमी झाले आहेत. ही माहिती अफगाणच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केली.
पूर्व अफगाणिस्तानाचा पाकटीका प्रांतातील सरोझई जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ही कारवाई झाली. या कारवाईत एएनएचा एक सैनिकही शहीद झाला आणि दोन जण जखमी झाले, असे मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये लवकरच दोहा येथे शांतता प्रस्थापित करण्याबद्दल चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. तालिबान आणि विद्यमान अफगाण सरकार यांच्यात समेट घडावा, तालिबाननं दहशतवाद सोडून संसदीय राजकारणात उतरावं, यासाठी अमेरिकेचा आटापिटा सुरू आहे. अफगाणिस्तानातून सोव्हिएत रशियाच्या लष्कराला हाकलून लावण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने तालिबानला जन्म दिला. तालिबानवर अद्याप पाकिस्तानच्या लष्कर आणि ‘आयएसआय’ गुप्तहेर संघटनेचा प्रभाव आहे.