वॉशिंग्टन - भारताने जर हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही, तर आम्ही भारताचा सूड घेऊ अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. पंतप्रधान मोदींनी इतर देशांसाठी हायड्रोक्लोरोक्वाईनची निर्यात बंद केली आहे, हे मला समजले. मी मोदींसोबत काल चर्चा केली, त्यामध्ये मी या देशांमधून अमेरिकेला वगळण्याबाबत त्यांना विचारणा केली. आमचे चांगले संबंध पाहता, भारताने ही निर्यातबंदी उठवली नाही, तर ते नक्कीच आश्चर्यकारक असेल.
जर निर्यातबंदीचा हा निर्णय पंतप्रधान मोदींचा असेल, तर त्यांनी मला तसे सांगितले पाहिजे. मी रविवारी सकाळी त्यांच्याशी बोलून, अमेरिकेला हे औषध पाठवण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली. जर त्यांनी तसे केले नाही, तर अमेरिका त्याचा नक्कीच सूड घेईल, आणि का घेऊ नये?
मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर अमेरिकेने या औषधाची भारताकडे मागणी केली होती. मात्र, भारताने देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या औषधाच्या निर्यातीला बंदी आणली आहे.
दरम्यान, अमेरिकेसोबतच आणखी काही देशांनीही या औषधाची मागणी भारताकडे केली आहे. त्यामुळे सरकार सध्या या निर्यातबंदीवर फेरविचार करत आहे.
हेही वाचा : स्वच्छता : जपानचे सर्वोच्च प्राधान्य!