नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटी दरम्यान व्हाइट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडलने अनेक भारतीय ट्विटर हँडल फॉलो केले होते. त्यानंतर काही आठवड्यातच त्यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटर खात्यांना अनफॉलो केले आहे. यावर व्हाइट हाऊस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
व्हाइट हाऊस ट्विटर हँडल सामान्यत: राष्ट्रपतींच्या दौऱ्या दरम्यान थोड्या काळासाठी यजमान देशांतील अधिकाऱयांचे ट्विटर हँडल फॉलो करते. राष्ट्रपती भेट देत असलेल्या देशांनी दौऱ्या संबधीत टि्वट केल्यास, ते रिट्वट करत त्याला पाठींबा दर्शवण्यासाठी अधिकाऱयांचे ट्विटर हँडल फॉलो केले जाते, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे.
काह व्हाइट हाउसच्या ट्विटर हँडलने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास यांचे ट्विटर हँडल फॉलो केले होते. व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून फॉलो केले जाणारे मोदी जगातील पहिले नेते ठरले होते. मात्र, फॉलो केल्यानंतरच अचानक व्हाइट हाउसने सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले.
व्हाइट हाउसने सर्व भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केल्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हाइट हाउसने भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केल्याने मी खूपच निराश झालो आहे. मी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती करतो, त्यांनी याची दखल घ्यावी, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
अमेरिकी प्रशासन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित ट्विटर हँडलच फॉलो करण्यास व्हाइट हाउसने पुन्हा सुरुवात केली आहे. व्हाईट हाऊस सध्या फक्त 13 ट्विटर हँडल फॉलो करत आहे.