वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यामध्ये आज पहिली अध्यक्षीय डिबेट (प्रेसिडेंशियल डिबेट) झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. बिडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा 'खोटारडा', असा उल्लेख केला. तसेच डिबेटदरम्यान, तुम्ही जरा गप्प बसाल का? (Will you shut up?) , असे जो बिडेन ट्रम्प यांना म्हणाले. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी, जो बिडेन यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी 6.30 वाजता ही डिबेट सुरू झाली. अमेरिकेतील कोट्यवधी मतदारांना त्यांचा अध्यक्ष निवडण्यासाठी दोन्ही नेत्यांची ध्येयधोरणे समजून घेण्यास मदत झाली. राष्ट्रीय वाहिन्यांवर ही चर्चा ९० मिनिटे चालली. मतदानाला अवघे काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत.
कोरोनाचा अमेरिकेला सर्वांत जास्त फटका बसला असून 2 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अर्थव्यवस्थेची गतीही मंदावरली आहे. मात्र, राष्ट्राध्यक्षांकडे कोणतेच धोरण नाही, असा आरोप बिडेन यांनी केला. तर, बिडेन यांचे दावे खोडून काढत, अमेरिकी प्रशासनाने कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणती पाऊले उचलली याची माहिती दिली.
सुप्रीम कोर्ट -
सुप्रीम कोर्टातील जागा भरणे हा चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा होता. रुथ गिन्सबर्ग यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी आहे. या डिबेट्समुळे मतदारांमध्ये उत्साह निर्माण होईल, अशी आशा रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोघांनाही आहे. जेणेकरून कोर्ट आरोग्य व्यवस्था, गर्भपात यासारख्या विषयावर निर्णय घेईल. गिन्सबर्ग यांच्या जागी अॅमी बॅरेट यांची नियुक्ती व्हावी, अशी सूचना ट्रम्प यांनी पूर्वीच केली आहे. तर याचवेळी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्यविषयक कायद्यांसदर्भात सुप्रीम कोर्टाने बदललेली भूमिका यावर बिडेन यांनी भर दिला.
कोरोना विषाणू -
ट्रम्प सरकारची कोरोना संकटाविषयची भूमिका हा चर्चेचा मुख्य भाग राहिला. अमेरिकेत आतापर्यंत २ लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज मृतांची संख्या वाढतच आहे. शाळा आणि अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोनाला चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी फेटाळला. ट्रम्प प्रशासनाने यासंदर्भात कोणकोणते निर्णय घेतले याची माहिती ट्रम्प यांनी अतिशय शांततेने या डिबेटमध्ये मांडली. आम्ही काही निर्णय घेतले नसते तर मृतांची संख्या वाढली असती, तसेच वेळीच अर्थव्यवस्था खुली केली नसती तर प्रचंड बेरोजगारीला सामोरे जावे लागले असते, असे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प समर्थकांनी कोरोनासंदर्भातील सरकारच्या भूमिकेचे नेहमी कौतुक केले आहे. कोरोना हा गंभीर आजार असल्याचे अद्यापही त्यांना मान्य नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक कोरोनासंदर्भात अतिशय हलकी भूमिका घेऊन त्यातील गांभीर्य संपवले, असे मत पत्रकार बॉब वूडवर्ड यांनी आपल्या नव्या पुस्तकात मांडले आहे.
ट्रम्प सरकारच्या कोरोनाविषयक धोरणांवर बिडेन आणि डेमोक्रॅट्सनी सातत्याने टीका केली आहे. त्यांच्या संपूर्ण प्रचार मोहिमेतील हा महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आज झालेल्या अध्यक्षीय चर्चेतही बिडेन या मुद्द्यावरून ट्रम्प यांना घेरताना दिसले.
ट्रम्प यांचे मुद्दे -
ट्रम्प यांच्याकडे अनेक मुद्दे होते. त्यांनी बिडेन यांच्या खासगी आयुष्यावर हल्ला करुन डिबेटला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस, ऑनलाईन मतदान, दंगली आदी मुद्द्यांना घात घातला. अनेक प्रश्नांची उत्तरे ट्रम्प यांनी दिली. फॉक्स न्यूजचे ख्रिस वॅलेस या चर्चेचे मॉडरेटर होते. डिबेटदरम्यान ट्रम्प यांनी बऱ्याच वेळा बिडेन बोलत असताना मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी ख्रिस यांना मी मॉडरेटवर असल्याचे ठणकावून सांगावे लागले.
बिडेन यांचे प्रत्युत्तर -
ट्रम्प यांनी सातत्याने बिडेन हे मानसिक रोगी असल्याची प्रतिमा अमेरिकन जनतेसमोर उभी केली आहे. या प्रतिमेला खोडून काढत मी जगातील सर्वात मोठ्या राष्ट्राचा प्रमुख बनू शकतो, ही भावना अमेरिकन लोकांमध्ये रुजवणे हे बिडेन यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. ट्रम्प सातत्याने बिडेन यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आले आहेत. त्यांनी बिडेन यांच्या मुलाचा उल्लेख करत खासगी आरोप केले.
राजकारणात अर्धशतक घालवलेल्या बिडेन यांच्याकडे ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक अनुभव आहे. तसेच विदेशी धोरणाबाबत बिडेन यांची समज उत्तम आहे.
व्यासपीठावरील चित्र
डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार बिडेन हे सोशलिस्ट असल्याची प्रतिमा रिपब्लिकन आणि ट्रम्प यांनी रंगवली आहे, तर बिडेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रम्प हे वंशवादी असल्याची प्रतिमा अमेरिकन लोकांमध्ये निर्माण केली आहे. आजच्या चर्चेमध्ये दोन्ही नेत्यांना समान वेळ देण्यात आली.
लोकशाहीचे काय -
ट्रम्प यांनी वारंवार ऑनलाईन व्होटर फ्रॉड होत असल्याचे आरोप केले आहेत. डिबेटमध्येही त्यांनी याचा उल्लेख केला. पोस्टल बॅलेट मतमोजणीच्या आधी कचऱ्याचा पेटीत सापडत असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी ऑलाईन आणि पोस्टल मतदानावर दाट संशय व्यक्त केला. निवडणुकीचे दिवस जवळ येत असताना ट्रम्प यांनी वारंवार या मुद्द्याला हात घातला आहे. ट्रम्प यांच्या या आरोपाला काही तथ्य नसले तरी ट्रम्प समर्थकांना यावर विश्वास आहे. यावर बिडेन यांनी त्यांची बाजू योग्यपणे मांडली. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करावा अशी समजूतदार भूमिका त्यांनी मांडली.
कोरोनामुळे यावेळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आणि पोस्टल पद्धतीने मतदान होणार आहे. या दरम्यान काही घोटाळा होणार नाही, यावर भर देण्यात येणार आहे.