वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय झाला आहे. अभूतपूर्व अशा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करत बायडेन व्हाईट हाऊसचे दावेदार ठरले आहेत. त्याबरोबरच अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एशियन अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. विजयी झाल्यानंतर बायडेन यांनी देशवासियांसाठी एक संदेश जारी केला आहे.
काय म्हणाले बायडेन ?
'उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हॅरिस आणि माझ्यावर अमेरिकेतील जनतेने विश्वास टाकला हा मी माझा सन्मान समजतो. अभूतपूर्व अशा संकट काळात नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. अमेरिकेत लोकशाही खोलवर रुजली असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता निवडणुका संपल्या असून राग, द्वेष बाजूला ठेवा आणि देश म्हणून सर्वांनी एकत्र या' असे आवाहन बायडेन यांनी नागरिकांना केले आहे.
'देशाने पुन्हा एकजूट होण्याची आणि उभारी घेण्याची वेळ आहे. संपूर्ण देश एकत्र आल्यावर सर्वजण मिळून करू शकत नाही, अशी एकही गोष्ट नाही. कोणी मला मतदान केले असेल किंवा नसेल मी सर्वांचा राष्ट्राध्यक्ष असेल. तुम्ही टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेल', असा संदेश बायडेन यांनी दिला आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे. ते अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ३ तारखेला मतदान झाल्यानंतर शनिवारपर्यंत मजमोजणी सुरू होती. अॅरिझोना राज्यात बायडेन यांनी विजय मिळविल्यानंतर २७० पेक्षा जास्त मते त्यांना मिळाली आहेत. तसेच पेन्सल्वेनिया राज्यातही ते आघाडीवर असून स्थानिक माध्यमांनी त्यांना तेथे विजयी घोषित केले आहे.