वॉशिंग्टन - गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतले. निर्वासन मुदत 31 ऑगस्टच्या एक दिवस आधीच अमेरिकन सैन्याने आपले मिशन पूर्ण करत अफगाणिस्तान सोडलं. यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले. तब्बल 20 वर्ष अमेरिका अफगाणिस्तानमध्ये शांतता कायम ठेवण्यात यशस्वी झाली, असे बायडेन आपल्या संबोधनादरम्यान म्हणाले.
तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केली असून अमेरिकेचे सैन्य माघारी जाण्याच्या दोन आठवडे आधीच तालिबानने काबूलचा ताबा घेतला. सैन्य माघारीच्या निर्णयावरून विरोधी पक्षाकडून बायडेन यांच्यावर टीका झाली होती. त्यांनी सैन्य माघारीची घाई केल्यानेच तालिबानने सत्ता काबीज केली, असे विरोधी पक्षाने म्हटलं. परंतु बायडेन यांनी सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय देशातील नागरिक, सैन्य सल्लागार, सेवा प्रमुख आणि कमांडर या सर्वांच्या शिफारशीवर आधारित होता.
बायडेन म्हणाले, की अमेरिकाने 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये शांतता राखली आहे. अमेरिकेने जे काम केले. ते इतर कोणीही करू शकले नसते. तालिबानची उपस्थिती असूनही देश सोडण्याची इच्छा असणाऱ्यांचे आपण निर्वासन केले. अफगाणिस्तानातून तब्बल एक लाख लोकांना बाहेर काढले. या दरम्यान, काबूल विमानतळाची सुरक्षा देखील सुनिश्चित केली गेल्याचे त्यांनी सांगितलं.
बिडेन म्हणाले, की येत्या काळात अमेरिकेला अफगाणिस्तान आघाडीसोबत काम करायला आवडेल. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे. हजारो लोकांना आता तिथे पाठवता येणार नाही. अफगाणिस्तानच्या भूमीचा अमेरिकेच्या किंवा इतर कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापर झाला नाही पाहिजे, असे बायडेन म्हणाले. तसेच त्यांनी अफगाणिस्तान सोडणे हा एक धोरणाचा भाग असल्याचे म्हटलं. आपण सोमालिया आणि इतर देशांमधील परिस्थिती पाहिली आहे. अफगाणी अमेरिकन सैन्याशिवाय स्वतःला मजबूत करू शकतील आणि हे काळ सांगेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेचे काम आणखी पूर्ण झालेले नाही. दोन दशकांपूर्वीच्या परिस्थितीत योग्य वाटणारा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता आपल्याला चीनकडून कडवे आव्हान दिले जात आहे. चीन आणि रशिया स्पर्धेत पुढे जात आहेत. त्यामुळे आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे आणि मुख्य तत्त्व अमेरिकेच्या हितावर आधारित असावीत. दोन दशकांपासून अफगाणिस्तानात 2 ट्रिलियन एवढा प्रचंड पैसा खर्च केला आहे. ही रक्कम आपण देशातील विकासकामांसाठी वापरू शकतो, असे बायडेन म्हणाले.
अमेरिका नेहमीच अफगाण लोकांची मदत करेल. तेथील महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी लढा देईल. पण ते हिंसाचारावर आधारित असणार नाही. राजनैतिक मार्गाने मानवी हक्क सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करू, असे बायडेन यांनी म्हटलं.