वॉशिंग्टन डी. सी - अफगाणिस्तानातून आपले सैन्य सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही घोषणा केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या सहकार्याने तालिबान अफगाणिस्तान सरकारमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अमेरिकेचे सैन्य अफागाणिस्तानातून माघारी घेण्यात येत आहेत. अफगाणिस्तानात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 2450 अमेरिकन सैनिक ठार आणि 20,000 हून अधिक जखमी झाले आहेत.
केवळ एका देशाच्या सुरक्षेवर हजारो सैनिकांचे लक्ष केंद्रित करणे आणि कोट्यवधी डॉलर्स खर्च करणे हा योग्य निर्णय नाही, असे बायडेन म्हणाले. त्यांनी विशेषत: पाकिस्तान आणि रशिया, चीन, भारत आणि तुर्की यांना अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
2001 पासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात -
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ऑक्टोबर 2001 मध्ये अफगाणिस्तानात अलकायदाच्या प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केल्याची माहिती व्हाईट हाऊस ट्रीटी कक्षातून देशाला माहिती दिली. याच ठिकाणाहून बायडेन यांनी सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. युद्ध संपवण्याची वेळ आली आहे, असे ते यावेळी म्हणाले. देशाला संबोधित केल्यानंतर बायडेन आर्लिंग्टनच्या स्मशानभूमीत पोहचले. येते त्यांनी अफगाणिस्तानात ठार झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा यांच्याशीही चर्चा करून अफगाणिस्तानातून सैन्याच्या माघारीचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानात सध्या अडीच ते तीन हजार अमेरिकन सैनिक आहेत.
अफगाण-अमेरिका संबंध संपुष्टात नाही -
सैन्याची माघार घेण्याच्या घोषणेनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्टोईन ब्लिंकेन काबूत दाखल झाले. ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि मुख्य कार्यकारी अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी त्यांनी ब्रसेल्समध्ये नाटो देशांशी चर्चा केली. नाटो देशातील सात हजाराहून अधिक सैनिक सध्या अफगाणिस्तानात तैनात आहेत. सैन्य माघार घेतल्याचा अर्थ अफगाण-अमेरिका संबंध संपुष्टात आले असा होत नसल्याचे ब्लिंकन यांनी अफगाण नेत्यांना सांगितले.
ऑस्ट्रेलिया सैन्य माघारी घेणार -
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही यावर्षी सप्टेंबरपर्यंत आपली सर्व सैन्ये अफगाणिस्तानातून माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे 39 हजाराहून अधिक सैनिक अफगाणिस्तानात तैनात आहेत.
सैन्य माघारीच्या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया -
सैन्य माघार घेण्याचा निर्णय जबाबदारीने घ्यावा. याचा फायदा दहशतवादी घेऊ शकतात. दहशतवादाशी लढा देणे हा दोन्ही देशांचा संयुक्त अजेंडा आहे, असे चीनने म्हटलं आहे. अमेरिेकेने सैन्य माघारी घेतल्यास उइगर दहशतवाद्यांच्या कारवाया वााढण्याची चीनला भीती आहे.
हेही वाचा - आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या