वॉशिंग्टन डी. सी- कोरोना महामारीमुळे जागतिक मंदी आली आहे. अशातच अमेरिकेच्या फेडरल बँकेतील अधिकाऱ्याने रोजगाराची स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा दिली आहे. एप्रिल महिन्यापासून २ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र, रोजगाराची स्थिती यापेक्षा गंभीर होणार असल्याचे फेडरल बँकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सध्या जगातील अनेक देश निर्बंध शिथिल करत आहोत. अनेक उद्योगव्यवसाय सुरू होत आहेत. त्यांना सुरक्षा घ्यावी लागत आहे. मात्र, जर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले तर परत कडक निर्बंध लादावे लागतील, आणि सर्वकाही ठप्प होईल, असे मिनियापोलीस राज्याच्या फेडरल बँकेचे प्रमुख नील कशकारी यांनी म्हटले आहे.
आधी कोरोना संपवावा लागेल
'जर आर्थिक प्रश्न सोडवायचे असतील तर त्याआधी आपल्याला कोरोनाला संपवावा लागेल, हे तथ्य आपल्या डोळ्यासमोरून जाता कामा नये. मागील काही दिवसांमधून एक गोष्ट शिकायला भेटली ती म्हणजे, अर्थव्यवस्था आणि सर्व जनजीवन हळूहळू सुरळीत होईल, असे कशकारी म्हणाले. मात्र, याच्या विरुद्ध मत व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी मांडले आहे. २०२० वर्षातील शेवटचे सहा महिन्यांपासून मोठ्या आशा असून २०२१ वर्षांपर्यंत सर्व काही वेगाने ठीक झालेले असेल, असा व्हाईटहाऊस मधील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
सर्वकाही सुरळीत होईल हा विश्वास येण्याची गरज
जगभरातील देश लॉकडाऊन निर्बंध शिथिल करत आहेत. मात्र, त्यामुळे कोरोना पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी बराच काळ असेच सुरू राहील. त्यामुळे सर्वकाही ठीक होण्यास आणखी वेळ लागेल. कोरोनावर लस आली, मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि उपाचार पद्धती विकसीत झाली, तर घराबाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. त्यानंतरच अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने सुरळीत होईल. मात्र, लोकांमध्ये हा विश्वास कधी येईल मी सांगू शकत नाही. अमेरिकेत १४.७ टक्के बेरोजगारी वाढल्याचे ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिकने म्हटले आहे.