वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 1 लाख 50 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे तरुण बार, रेस्टॉरंट्स आणि व्यायामशाळेत जात आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव स्थिर आहे. मात्र, जास्त प्रमाणात गर्दी झाल्यास कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या ही जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये कोरोनाचा सर्वांत जास्त प्रभाव पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत ब्राझिलमध्ये 88 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलनंतर भारत, रशिया, दक्षिण अफ्रिका आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेले हे सर्वोच्च पदस्थ व्यक्ती आहेत. यापूर्वी राष्ट्राध्यक्षांच्या एका खासगी वॅलेटला, तसेच उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्रकार सचिवालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची दररोज कोरोना चाचणी करण्यात येत आहे.