वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाखांच्या पुढे गेला आहे. आज(बुधवारी) नव्याने 10 हजार रुग्ण आढळून आल्याने एकून रुग्णसंख्या 4 लाख 10 हजार 970 झाली आहे. तर 14 हजार 214 जण दगावले आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. अमेरिकेपुढील कोेरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
22 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आढळून आले आहेत. तेथे 1 लाख 42 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याखालोखाल न्यूजर्सी राज्यात 47 हजार रुग्ण आढळून आले आहेत. मिशिगन, कॅलिफोर्निया, लुयीशिना आणि पेन्सलवेनिया राज्यातही 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेने आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोना चाचण्या घेतल्या आहेत.
जगभरात आत्तापर्यंत 14 लाख 85 हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 87 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.