वॉशिंग्टन डी.सी - कोरोना महामारीमुळे सध्या चीन आणि अमेरिकादरम्यान तणाव आहे. यातच वांशिक अल्पसंख्यांकांवरील चिनच्या क्रूर कारवाईवर कडक भूमिका घेण्यासाठी बुधवारी अमेरिकेच्या संसदेत द्विपक्षीय विधेयक मंजूर करण्यात आले आहे. संसदेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही सदस्यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले. यामध्ये मुस्लिमांना ताब्यात ठेवल्यावरून आणि निगराणी केल्याप्रकरणी चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा प्रतिबंधित केला जाणार आहे.
हे विधेयक कायद्यात रुपांतर करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता आहे. या विधेयकाचा अतिशय गांभीर्याने विचार करू, असे डोनाल्ड ट्रम्प गेल्या आठवड्यात म्हणाले होते. दरम्यान कोरोना आणि हाँगकाँगमधील नागरी हक्कांवर बंदी घालण्याच्या चीनी योजनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात आधीच तणाव आहे. या विधेयकामुळे हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम बंदिवासात ठेवण्यात आले आहे. सुमारे 1 दशलक्ष उईगर आणि इतर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चीन या शिबिरांना प्रशिक्षण शिबिरे म्हणून संबोधत असून या शिबिराच्या माध्यमातून ते कट्टरता निर्मूलनाबरोबरच लोकांची कौशल्ये वाढवत असल्याचे सांगत आहे.
यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या दुटप्पी वागण्यावर प्रकाश टाकला होता. त्या वेळी, मुस्लिमांना बंदिवासात ठेवून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या चीनविरोधात मूग गिळून गप्प बसलेल्या पाकिस्तानला अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सचिव अॅलिस वेल्स यांनी फटकारले होते. याचबरोबर अमेरिकेने मुस्लिमांना ताब्यात ठेवल्यावरून चीनच्या अधिकाऱ्यांना व्हिसा प्रतिबंधित केला आहे.