व्हॅटीकन सिटी - अमेरिकन कार्डिनल केल्विन फेरल यांनी काल (शुक्रवारी) व्हॅटीकन सिटीमध्ये कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या दुर्दैवी आणि अन्यायकारक मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच वर्णद्वेषाबाबतही त्यांनी नाराजी दर्शवली. व्हॅटीकन सिटीमध्ये अमेरिकेच्या भविष्याबद्दल आणि जॉर्जबद्दल प्रार्थना कार्यक्रम घेण्यात आला. अमेरिकेच्या संविधानातील ख्रिश्चन तत्त्वे कृष्णवर्णीय नागरिकांना लागू होत नसल्याचे कार्डिनल फेरल यावेळी म्हणाले. जॉर्जबाबत घडलेली घटना निंदनीय असून, एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना आहे.
"मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका"
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला.