वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुडगूस घातल्यानंतर अनेक उच्चपदस्थांनी राजीनामा दिला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रमुखांनी राजीनामाही आज राजीनामा दिला. युएस कॅपिटॉल पोलीस चिफ स्टिवन सुंद यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. आंदोलकांना रोखण्यात अपयश आल्याची टीका त्यांच्यावर होत होती, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
ट्रम्प यांनी मान्य केला पराभव -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य केला आहे. पुढील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असतील अशी घोषणा त्यांनी अधिकृतरित्या केली आहे. काल (गुरुवार) डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेच्या कॅपिटॉल हिल इमारतीत धुडगूस घातल्यानंतर या घटनेचे जगभरात प्रतिसाद उमटले. हा अमेरिकेच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप डेमोक्रटिक पक्षाने केला.
चार आंदोलकांचा झाला मृत्यू -
आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत काल चार आंदोलकांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी संसदेचे बॅरिकेडस् तोडत आत प्रवेश मिळवला. तसेच आतील सामानाची तोडफोड केली. संसद सदस्यांना बाकाखाली लपण्याची वेळ आली. आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरने नियमांचे उल्लंघन केल्याच ठपका ठेवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. २४ तासांसाठी ट्रम्प यांचे इस्टाग्राम खाते बंद करत असल्याची घोषणा इस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मॉझेरी यांनी केले आहे. फेसबुकने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रम्प यांचे व्हिडिओ काढून टाकले आहेत. तर ट्विटरनेही ट्रम्प यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.