वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेचे संसद भवन म्हणजेच कॅपिटोल हिल परिसरात एका वाहनाने दोन सुरक्षा रक्षकांना धडक दिली होती. यातील एका सुरक्षा रक्षकाचा आणि धडक देणाऱया वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कॅपिटोल हिल परिसरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील बाहेर ये-जा करण्यास परवानगी नाही.
सुरक्षा रक्षकांनी धडक देणाऱ्या वाहनाला तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहनचालकाने वाहन त्यांच्या अंगावर घातले. त्याच्याकडे चाकू देखील होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इतर सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर वाहन चालक आणि जखमी सुरक्षा रक्षकांना रूग्णालयात दाखल केले होते. हा अपघात आत्मघातकी वाटत असला तरी तसा काही प्रकार नव्हता, असे कॅपिटोल पोलिसांचे कार्यकारी प्रमुख वाय पीटमन यांनी सांगितले.
या घटनेनंतर कॅपिटोल परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांच्या फौजफाट्यामुळे परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. जानेवारी महिन्यात देखील कॅपिटोल परिसरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी पोलीस अधिकारी ब्रायन सिकनिक यांच्यासह पाच लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -पाकिस्तानचा युटर्न, भारतातून साखर आणि कापूस आयातीचा निर्णय रद्द