न्यूयॉर्क - इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि द लेव्हंट(दाएश ) सारख्या दहशतवादी नेटवर्कचा धोका अद्याप कायम असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदने म्हटलं. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर संयुक्त राष्ट्र संघाचे दहशतवाद विरोधी अधिकारी व्लादिमीर वोरोनकॉफ यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादी संघटना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, काही अतिसंवेदनशील भागात प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटलं.
आज, आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर दाएश आणि अल-कायदा या दोन्ही दहशतवाद्यांना सामोरे जात आहोत. कारण या संस्था केवळ नवीन तंत्रज्ञानाद्वारे कार्यरत नाहीत. तर दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार असलेल्या लोकांना जोडत आहेत, असे व्लादिमीर वोरोनकॉफ म्हणाले. अफगाणिस्तानचा पुन्हा कधीही जागतिक दहशतवादी कारवायांसाठी वापर होणार नाही, हे सुनिश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
एकीकडे, दाएशने इराक आणि सीरियामध्ये आपली क्षमता पुन्हा तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच अलिकडच्या काही महिन्यांत आफ्रिकन खंडात त्याचा वाढता प्रसार, चिंताजनक आहे, असे वोरोनकॉफ म्हणाले.