न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टोनिओ गुटेरेस यांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त संयम बाळगण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात ३२ जणांचा बळी गेला आहे.
दिल्लीतील हिंसाचारामध्ये लोकांचा बळी गेल्याच्या माहितीने सरचिटणीसांना दुःख झाले आहे. त्यांनी अशा परिस्थितीचा सामना यापूर्वीही केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हिंसा टाळून, जास्तीत जास्त संयम बाळगण्याची मागणी ते करत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी बुधवारी दिली.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये नागरिकता सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्या आंदोलनांमध्ये हिंसाचार घडत आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा बळी गेला आहे, तसेच २०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, उत्तरपूर्व दिल्लीच्या अनेक भागांमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा : अमेरिका-तालिबान शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान कतारमध्ये..