न्यूयॉर्क - या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये अमेरिकेतील 2 कोटी लोकांना कोरोना विषाणूवरील लस मिळू शकेल. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या लसी समन्वय कार्यक्रमाच्या प्रमुखांनी आज ही माहिती दिली. यानंतरच्या पुढील महिन्यांत प्रत्येक महिन्याला अडीच ते तीन कोटी अमेरिकन लोकांना लस दिली जाईल, असेही ते म्हणाले. मात्र, हे सर्व लसीकरणाच्या गतीवर अवलंबून आहे.
ऑपरेशन वॉर्प स्पीड (ओडब्ल्यूएस) चे मुख्य सल्लागार मोन्सेफ स्लोए म्हणाले, 'फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापर्यंत अधिक लसींना परवानगी दिली गेली तर, आम्ही अधिकाधिक अमेरिकन लोकांना ही लस उपलब्ध करून देऊ शकू.'
हेही वाचा - अमेरिकेत 9 लाखांहून अधिक मुलांना कोरोनासंसर्ग
ओडब्ल्यूएस हा ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. याअंतर्गत कोविड - 19 लसीच्या विकास, उत्पादन आणि वितरणाला गती देण्याचे काम करण्यात आले आहे. दुसरीकडे, स्लोए यांची ही टिप्पणी अशा वेळी आली जेव्हा अमेरिकेची कोविड - 19 बद्दलची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. येथे सुमारे 1 कोटींहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि 2.44 लाख लोक मरण पावले आहेत.
अमेरिका सध्या 6 लसींवर काम करत आहे. यातील फायझर आणि बायोएनटेकद्वारे विकसित केलेली लस सर्वात महत्त्वाची आहे. फायजरने अमेरिकन सरकारला लसींचे 10 कोटी डोस देण्यासाठी 1.95 अब्ज डॉलर्सच्या करारावरही स्वाक्षरी केली आहे.
स्लोए म्हणाले की, त्यांनाही मॉडर्ना लसीकडून चांगली बातमी अपेक्षित आहे. त्याच वेळी, उर्वरित लसीदेखील त्यांच्या क्लिनिकल चाचण्या करत आहेत.
हेही वाचा - पाकिस्तानात दिवाळी उत्साहात साजरी; रोषणाई आणि फुलांनी सजवले मंदिर