वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाबाबत चुकीची माहिती देणे महागात पडले आहे. ऐन निवडणूक प्रचारात ट्विटरने ट्रम्प यांच्या टीमचे अकाउंट तात्पुरते बंद केले आहे. तर फेसबुकनेही चुकीची माहिती देणारा ट्रम्प यांचा व्हिडिओ काढून टाकला आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी लहान मुलांमध्ये प्रतिकारक्षमता असते, असा डोनाल्ड ट्रम्प यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दावा केला. हा व्हिडिओ त्यांच्या टीमकडून ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. याबाबत बोलताना फेसबुकचे प्रवक्ते अँडी स्टोन म्हणाले, की लोकांमध्ये प्रतिकारक्षमता असलेला व्हिडिओ हा कोरोनाबाबत चुकीची माहिती देत आहे. हे आमच्या धोरणाविरोधात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काढल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या टीमने मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला होता. ट्विटरने थेट ट्रम्प यांच्या टीमचे अकाउंट तात्पुरत्या काळासाठी बंद केले आहे. चुकीची माहिती देणारे ट्विट काढेपर्यंत अकाउंट बंद राहणार असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या प्रवक्त्या कर्टनी पॅरेला म्हणाल्या की मुलांना कोरोनाचा धोका कमी असतो, असे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते. समाज माध्यम कंपन्या अध्यक्षांबाबत एकांगी विचार करत असल्याचाही त्यांनी दावा केला. समाज माध्यम कंपन्यांनी सत्याचा विपर्यास करू नये, असे त्यांनी आवाहन केले.
यापूर्वी नाझीचे चिन्ह वापरलेली ट्रम्प यांची जाहिरात फेसबुकने जूनमध्ये काढून टाकली होती. दरम्यान, अमेरिकेत आजवर एकूण 2 लाख 40 हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.